केडगाव : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी नावाचे छोटेसे खेडे आहे. येथे डोंगराच्या पायथ्याला म्हणजे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर धनगर समाजातील ढेबे आणि कचरे परिवार यांची वस्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्षे उलटून गेली. पण, ही वस्ती आजपर्यंत अंधारात होती. अखेर माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव आनंद थोरात यांच्या पुढाकारामुळे तिथे घराघरात वीज पोहचली आहे.
गाडगेवाडीतील ढेबे आणि कचरे परिवारात लाईट जाणे शक्यच नाही असे म्हणत अधिकारी यायचे, पाहायचे आणि निघून जायचे. याची कुणकुण आनंद थोरात यांना लागली. आज सगळ्यांच्या घराघरात वीज कनेक्शन असताना तिथे लाईट अजून पोहोचली नसल्याचे दुःख आनंद थोरात यांच्या मनात घर करून राहिले. गेल्या दोन वर्षापासून या गोष्टीचा ते महावितरणच्या कार्यालयात पाठपुरावा करत होते. त्यात त्यांना खऱ्या आर्थाने यश मिळाले आहे.
आनंद थोरात यांना या यशात मदत मिळाली ती महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी रणजित चांदगुडे यांची. रणजित चांदगुडे यांनी काही दिवस केडगाव येथे काम केले होते, आणि योगा योगाने त्यांची पदोन्नती खंडाळा येथे झाली. याची माहिती आनंद थोरात यांना मिळताच चांदगुडे यांना त्यांनी गाडगेवाडीतील ढेबे आणि कचरे परिवाराच्या समस्या सांगितल्या. त्यानंतर भारत सरकारच्या घर तेथे विज या योजने अंतर्गत ढेबे आणि कचरे परिवारच्या घरात वीज पोहचवली आणि या परिवारांच्या घरातील 75 वर्षाचा अंधार संपुष्टात आणला.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सदर ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली. सदर कामासाठी पहिल्या टप्प्यात कचरे वस्तीसाठी 15 पोल एच टी लाईन, 3 पोल एलटी लाईन व रोहित्र उभारण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ढेबे वस्तीसाठी 9 पोल एल टी लाईन उभारणी करण्यात आली. सदर काम डीपीडीसीच्या माध्यमातून करण्यात आले. सदर काम माननीय आनंददादा थोरात यांनी दोन वर्षांपूर्वी मला केडगाव येथे कार्यरत असताना सुचविले होते. योगायोगाने पदोन्नतीवर खंडाळा उपविभाग येथे बदली झाली. त्यानंतर सदर काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. वरिष्ठ कार्यालयाने व आमदार मा मकरंद पाटील साहेब यांनीही यासाठी वेळोवेळी मदत केली. सदर काम आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटले.
रणजित चांदगुडे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी