मिरज: मिरजेतील उद्योजक आणि राजकीय कार्यकर्ते ॲड. चंद्रकांत रामचंद्र ऊर्फ सी.आर. सांगलीकर यांना पिंपरी-चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजेतून अटक केली आहे. बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे 27 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे सांगलीसह पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग पवार यांनी 18 नोव्हेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर ॲड. सांगलीकर आणि त्यांच्या इतर चार साथीदारांविरोधात बावधन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुढे पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. पीएसीएल कंपनीची तसेच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या ताब्यात असलेली मौजे सुस, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील 33 एकर जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचा आरोप आहे. या जमिनीची किंमत सुमारे 27 कोटी 91 लाख 90 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यवहारातून पीएसीएलमधील गुंतवणूकदार आणि शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ॲड. सांगलीकर सध्या मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मिरजेत छापा टाकला आणि त्यांना ताब्यात घेतले. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात अधिक तपास करून इतर आरोपींची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
ॲड. सी.आर. सांगलीकर यांनी 2014 मध्ये मिरज विधानसभा निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकेमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.






