मुंबई: आगामी नागरी निवडणुकांमध्ये काही ठिकाणी सत्ताधारी (Maharashtra Election) पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी (Nivadnuk Aayog) केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग करणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, प्रलोभन किंवा जबरदस्तीचा वापर झाला का, याबाबत आयोगाने संबंधित महानगरपालिकांकडून सविस्तर अहवाल मागवले आहेत. (Marathi News)

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी 16 जानेवारीला पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर होती. या प्रक्रियेनंतर काही महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडी झाल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे 5 आणि शिवसेनाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही किमान 1 भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित प्रभागातील निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवले जाणार आहेत. हे अहवाल प्राप्त होईपर्यंत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस, जनता दल आणि आम आदमी पक्ष यांनी मुंबईतील कुलाबा परिसरातील काही प्रभागांमध्ये उमेदवारांवर दबाव टाकून बेकायदेशीर पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील नागरी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आयोगाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







