IND vs BAN : बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट सीरिजचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय भारताच्या संघाला या दौऱ्याची परवानगी देईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (IND vs BAN)

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-20 सामन्यांची सीरिज खेळवली जाणार आहे. ही सीरिज सप्टेंबर महिन्यात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारत-बांगलादेश सीरिजचं वेळापत्रक
-
पहिली वनडे -1 सप्टेंबर
-
दुसरी वनडे -3 सप्टेंबर
-
तिसरी वनडे – 6 सप्टेंबर
-
पहिली टी-20 -9 सप्टेंबर
-
दुसरी टी-20 -12 सप्टेंबर
-
तिसरी टी-20 -13 सप्टेंबर
भारताने मागील वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशचा दौरा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला होता. मात्र आता दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा झाल्यानंतरच या सीरिजची घोषणा करण्यात आल्याचा दावा बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात भारतभर आंदोलन सुरू आहे. मागील १५ दिवसांत दीपू चंद्र दास यांच्यासह चार हिंदूंची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.
याच मुद्द्यावरून आणखी एक वाद निर्माण झाला आहे. आयपीएल 2026 साठी केकेआरने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला 9 कोटी 20 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. मात्र बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना केकेआरने मुस्तफिजूरला संघात घेऊ नये, अशी मागणी काही हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे. शाहरुख खानच्या केकेआरने हा निर्णय मागे घ्यावा, असंही या संघटनांचं म्हणणं आहे.
एकीकडे क्रिकेट सीरिजची घोषणा झाली असली, तरी दुसरीकडे सुरक्षेचा आणि राजकीय वातावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.







