वाघोली: हवेली तालुक्यातील केसनंद येथे जमिनीचा बिगर शेती (NA) परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका शेतकऱ्याची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपीने सरकारी यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार बाबासाहेब तुकाराम हरगुडे यांची केसनंद (ता. हवेली) येथील गट क्रमांक 172 मध्ये जमीन आहे. या जमिनीचे बिगर शेती परवाना मिळवण्याचे काम त्यांनी सुरुवातीला एका आर्किटेक्टकडे सोपवले होते. मात्र, त्यानंतर अरुण दत्तात्रय गायकवाड याने हरगुडे यांची भेट घेतली. आपण पीएमआरडीए आणि महसूल विभागातील अशी अनेक कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, अशी बतावणी करत त्याने हे काम स्वतःकडे घेण्याचा आग्रह धरला. हरगुडे हे शेती व दुग्ध व्यवसायात व्यस्त असल्याने त्यांनी गायकवाडवर विश्वास ठेवून काम त्याच्या हवाली केले.
काही दिवसांतच हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून गायकवाडने हरगुडे यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि धनादेशाद्वारे 35 लाख रुपये उकळले. गायकवाडने सादर केलेली कागदपत्रे जेव्हा केसनंदच्या तलाठ्याकडे पडताळणीसाठी आली, तेव्हा त्यात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यामुळे हे प्रकरण अप्पर तहसीलदारांकडे पाठवण्यात आले. अप्पर तहसीलदारांनी भूमी अभिलेख विभागामार्फत सखोल चौकशी केली असता, सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
5 जून 2026 रोजी एका बातमीतून या गैरव्यवहाराची माहिती मिळताच हरगुडे यांनी गायकवाडशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद करून पोबारा केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हरगुडे यांनी वाघोली पोलिसांत धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






