पुणे: पुणे शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत शहरातील दुकानांच्या वेळांबाबतचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता पुणे शहरातील सर्व परवानाधारक दुकाने आणि आस्थापने २४ तास सुरू ठेवण्यास पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष समन्वय बैठक पार पडली. यामध्ये सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्यासह व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा मुख्य उद्देश व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव दूर करणे हा होता. आतापर्यंत दुकानांच्या वेळांबाबत व्यापाऱ्यांमध्ये जो संभ्रम होता, तो या बैठकीनंतर पूर्णपणे निवळला आहे.
या निर्णयानुसार, अधिकृत परवाना असलेल्या सर्व दुकानांना आता दिवस-रात्र व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही बाबींवर मर्यादा कायम ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये टपऱ्या, हातगाडी व्यावसायिक, फेरीवाले, पानटपऱ्या आणि खाऊ गल्ल्यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी असेल. या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, व्यापाऱ्यांच्या दैनंदिन समस्यांचे आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आता एक स्वतंत्र ‘नोडल ऑफिसर’ नियुक्त केला जाणार आहे. या निर्णयामुळे पोलीस आणि व्यापारी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळेल.
पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक आणि लवचिक भूमिकेचे व्यापारी संघटनांनी मनापासून स्वागत केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत शहराचा व्यापार वाढवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि व्यापारी आता एकत्रितपणे काम करणार आहेत.






