पिंपरी-चिंचवड: अवैध मद्यविक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली असून, यामध्ये अवैध दारूच्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अवैध दारूमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका लक्षात घेता, प्रशासनाने या गुन्हेगारी कारवायांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले आहे.

भेसळयुक्त दारू आणि बेकायदेशीर हातभट्ट्या शोधून त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. दोन्ही विभागांमधील गुप्त माहिती देऊन संयुक्तरीत्या धाडी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या दिवसांत या तिन्ही पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र होणार आहे.

अवैध दारू निर्मिती, तिची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे.
गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जाणार असून, त्यांना कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात पकडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे आणि दोन्ही यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







