शिरूर: पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला अजिम बशीर पटेल (वय ४२,रा. हुडको कॉलनी, शिरूर,जि. पुणे) हा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शिरूरमध्ये आल्याचे आढळून आले.तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत अजिम पटेल हा तडीपार आदेश लागू असतानाही शिरूर येथील हुडको कॉलनी परिसरातील आपल्या घरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे,सहायक फौजदार संजय पडयाळ, पोलिस हवालदार तुषार पंधारे,जनार्धन शेळके,विकास पाटील,पोलिस अंमलदार सागर धुमाळ आदींच्या पथकाने हुडको कॉलनी परिसरात जाऊन शोध घेतला.त्यावेळी अजिम पटेल हा तेथे आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडे पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आहे का? अशी विचारणा केली असता,आपल्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन शिरूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

पोलिस अभिलेख तपासला असता,पुणे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार अजिम पटेल याला दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासह) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले असल्याचे समोर आले.मात्र,संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता तो शिरूरमध्ये आल्याने तडीपार आदेशाचा भंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजिम पटेल याच्याविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलिस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यामध्ये चोरी,खुनाचा प्रयत्न,खंडणीसह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार संजु ज्ञानदेव जाधव यांनी फिर्याद दिली असून,शिरूर पोलिस ठाण्यात मुंबई पोलीस कायदा व कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार राजेंद्र साबळे हे पुढील तपास करीत आहेत.






