नांदेड : प्रेमप्रकरणातून झालेल्या सक्षम ताटे हत्याकांडानंतर चर्चेत आलेली आंचल मामिडवार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या आंचलने काही महिन्यांतच ते घर सोडले होते. याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आंचलने प्रथमच माध्यमांसमोर येत घर सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

आंचलने गंभीर आरोप करत सांगितले की, सक्षमचा धाकटा भाऊ तिच्याशी गैरवर्तन करत होता. हा प्रकार तिने घरातील सदस्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र तिच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांनी तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवला नाही.

“मी ही बाब घरच्यांना अनेकदा सांगितली. पण माझ्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. भविष्यात आणखी काही अयोग्य प्रकार घडल्यास माझ्यावरच अविश्वास दाखवला जाईल, अशी भीती मला वाटू लागली होती. त्यामुळेच मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला,” असे आंचलने सांगितले.
तिने पुढे सांगितले की, घर सोडताना तिने कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. तसेच पोलिसांनाही परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती. पोलिसांच्या उपस्थितीतच ती वडिलांच्या घरी परत गेली. सध्या ती आपल्या माहेरी राहत असल्याचे तिने स्पष्ट केले.
दरम्यान, सक्षमची आई संगीता ताटे यांनी काही दिवसांपूर्वी आंचल आजारी आजीला भेटण्याचे कारण सांगून घरातून गेली आणि पुन्हा परतली नाही, असा दावा केला होता. त्यावर उत्तर देताना आंचलने घर सोडण्यामागे वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे सांगितले.
सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या टीका आणि चर्चांबाबतही आंचलने नाराजी व्यक्त केली. सत्य परिस्थिती जाणून न घेता कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहन तिने केले आहे.







