लहू चव्हाण / पाचगणी : भिलार गावातील पाझर तलावात एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज रविवारी (दि. 20) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे भिलार गावावर शोककळा पसरली आहे. जयदीप मुकुंद भिलारे (वय २६, भिलार, ता. महाबळेश्वर) असं बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या युवकाचा शोध सुरू होता. मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप हा चारच्या दरम्यान पोहण्यासाठी गेला होता. पोहोत असताना तो पाण्यात बुडू लागला. तेव्हा तो वाचवा वाचवा असा आवाज देत होता. परंतु काही वेळातच तो खोल पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी पाझर तलावाकडे धावले.
दरम्यान, गावातील काही युवकांनी पाण्यात उतरून जयदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तो सापडला नाही. काही ग्रामस्थांनी लागलीच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि पांचगणीतील ऐस. ओ. ऐस. टीम च्या सदस्यांना पाचारण केले. सात वाजता या दोन्ही टीम भिलार मध्ये दाखल झाल्या.
रात्री उशिरा बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. मात्र, जयदीपचा शोध लागला नाही. पांचगणी पोलीस, भिलारचे पोलीस पाटील, ग्रामस्थ या ठिकाण दाखल झाले. यावेळी तलावाच्या काठाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. महाबळेश्वर रेस्क्यू टीमचे सदस्य सुनील भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, अक्षय नाविलकर, अनिकेत वाघदरे, सोमनाथ वाघदरे, सनी बावळेकर, दीपक ओंबळे, यांचबरोबर पांचगणी एसओएस टीमचे सर्व सदस्य शोध मोहिमेत सहभागी झाले होते.