सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मायथळ गावात दीड वर्षाच्या चिमुकलीसह गर्भवती विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नीता गजानन सोलनकर (वय २९) आणि त्यांची मुलगी अवनी गजानन सोलनकर (वय दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून नीतांनी मुलीसह टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नीता यांचा सुमारे तीन वर्षांपूर्वी गजानन आप्पासाहेब सोलनकर यांच्याशी विवाह झाला होता. गजानन खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून किरकोळ वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी नीता आणि अवनी यांचे मृतदेह गावातील विहिरीत आढळून आले. या घटनेमुळे सोलनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धसाडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत शोधमोहीम राबवून अथक प्रयत्नांनंतर मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी दोन्ही मृतदेह ओढणीने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिक आणि नातेवाईक भावूक झाले.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नीतांची सासू रखूबाई आप्पासाहेब सोलनकर यांना मारहाण केली. या प्रकारामुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेले नीतांचे पती गजानन सोलनकर तेथून पळून गेले. गजानन फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

नीता आणि अवनी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत.







