पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेली महाज्योती शिष्यवृत्ती परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आधीच आक्रमक झाले होते. त्यातच आता या नवीन तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील ‘सन ब्राईट स्कूल’ या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी वेळेवर केंद्रावर पोहोचले, परंतु परीक्षा सुरू होताच विविध तांत्रिक समस्या सुरू झाल्या. अनेक संगणक बंद स्थितीत होते, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे लॉगिनच होऊ शकले नाही. ज्या काही विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले, त्यांचे संगणक काही वेळातच अचानक बंद पडले किंवा ऑटो-लॉगआउट झाले. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निर्धारित वेळ वापरता आला नाही आणि केंद्रावर पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अखेर या सर्व गोंधळामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. या घटनेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक नारिंगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. तांत्रिक चुकीचा फटका विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसू नये, तसेच त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी त्वरित उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

सध्या राज्यातील नीट आणि एमपीएससी परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थी आंदोलन करत असतानाच महाज्योती परीक्षेतील या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.







