अजित जगताप
कराड : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना लोकशाहीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे समता- स्वातंत्र्य- बंधुत्व व हक्क तसेच मतदानाचा अधिकार मिळाला आहे. हा अधिकार बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असा मनाशी ठाम निश्चय केलेले पेरले (ता. कराड) येथील उच्च विद्याविभूषित तरुण जयेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी आसावरी चव्हाण यांनी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी अमेरिकेतील टेक्सास शहर ते पेरले असा प्रवास केला आहे. त्यामुळे पेरले परिसरात चव्हाण दाम्पत्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.
पेरले (ता. कराड) येथील स्वातंत्र्य सैनिक महादेव शिवराम चव्हाण यांचे नातू आणि सहकार क्षेत्रातील महामेरू तसेच राजकीय विश्लेषक जयसिंगराव चव्हाण -पेरलेकर यांचे सुपुत्र जयेश चव्हाण व सून आसावरी चव्हाण हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते दोघेही अमेरिकेतील टेक्सास शहरात मागील दहा वर्षापासून नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत.
परंतु, भारत देशाबद्दल असलेला अभिमान व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करण्यासाठी आज स्वखर्चाने ते टेक्सास शहरातून पेरले येथे मतदान करण्यासाठी आले. कोणताही मोठा गाजावाजा व बडेजावपणा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मतदार म्हणून त्यांनी पेरले येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदान केले.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, वाई- खंडाळा- महाबळेश्वर, सातारा, जावळी, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघात एकूण ६३.१६ टक्के एवढे मतदान झाले आहे. काहीजण शहरात व गावात असूनही मतदान करण्यासाठी आले नाहीत. त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकार सुशिक्षित व विद्याविभूषित चव्हाण कुटुंबीयांनी केला असल्याची प्रतिक्रिया लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेकांनी दिली.
वास्तविक पाहता मतदान करण्याचा अधिकार ज्यांनी प्राप्त केला आहे. त्यांना आता देशाच्या समस्या व देशाच्या विकासाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या अर्थाने चव्हाण कुटुंबीयांनी अधिकार प्राप्त केलेले आहे. त्यांच्या या भूमिकेचे अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे.