सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्षाबंधन सणासाठी भाऊ बहिणीला घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत घडली आहे.
रोहित तात्यासो जाधव (वय-25 वर्षे), ऋतुजा तात्यासो जाधव (वय-19 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या बहीण भावाची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रोहित आणि ऋतुजा हे बहीण भाव मंगळवेढ्याचे रहिवाशी आहेत. रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जाताना झालेल्या भीषण अपघातात दोन्ही बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जागेवरच कारमधील बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने उपस्थित नागरिकांना गहिवरुन आले.
दरम्यान, पंढरपूरहून-मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार पंढरपूरकडे येत होती, त्यावेळी आयशर टेम्पो समोरून येत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून कारमधील बहीण भाव जागीच ठार झाले आहेत. दोन्ही मृत बहीण भावाचे मृतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाचा काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.