शिये (कोल्हापूर): सायकलवरून शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस वाटेत अडवून ‘तू मला खूप आवडतेस, मी रोज तुला पाहतोय, तू मला मेसेज कर,’ अशी छेड काढणाऱ्यांना मुलीच्या भावाने जाब विचारला म्हणून २८ जणांच्या जमावाने काठ्या, गज, कुऱ्हाड व विळ्यासारख्या धारदार शस्त्रांनी मुलीच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संभापूर, ता. हातकणंगले येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे हे अल्पवयीन मुलीस एकटी शाळेत येता-जाता तिच्या समोर दुचाकी आडवी लावत छेडछाड करत होते. मुलीने त्यांना नकार देताच आकाश आणुसे याने मुलीस तू तुझ्या भावाला सांग, नाहीतर कोणालापण सांग, मी भित नाही, असे म्हणत आकाश व अर्जुन दोघेही निघून गेले.
मुलीच्या भावाने याबाबत आकाश आणुसे व अर्जुन कारंडे यांच्याकडे विचारणा केली असता, ते दुचाकी रस्त्यावरच सोडून गेले. मुलीच्या भावाने त्यांची दुचाकी घरात आणून लावली असता आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे, प्रकाश संभाजी आणुसे, सुजय संजय कारंडे, काशिनाथ कारंडे, राज कटमंत्री (माने), रोहित जगन्नाथ कारंडे, किरण रावसाहेब आणुसे, अमोल रावसाहेब आणुसे (सर्व रा. संभापूर) व इतर अनोळखी लोकांनी हातामध्ये काठ्या, गज, कुऱ्हाड व विळ्यासारखी हत्यारे घेऊन घरामध्ये घुसून मुलीला व तिच्या भावाला सोडणार नाही, असा दम देत यश प्रकाश भोसले (वय १७) व तानाजी बबन भोसले यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर फिर्यादी यांच्या सासू, दिर यांना ढकलून दिले. तसेच घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. वाद सोडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात साधना प्रकाश भोसले यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.