बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे महिन्याला १५०० रूपये मिळवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने बार्शी तालुक्यात बनावट कागदपत्रे तयार करून २२ अर्ज शासनाच्या पोर्टलवर भरून शासनाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा पठाण यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत त्यांनी असे म्हटले की, जून २०२४ पासून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाभार्थी महिलांनी ‘ऑनलाईन नारीशक्ती अॅप व योजना दूत पोर्टलवर भरलेल्या अर्जावर शासन निकषानुसार कागदपत्रांची पडताळणी करत असताना ८५ हजार अर्जामध्ये २२ अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या. त्यामध्ये रहिवासी नाव, आधार नंबर, रेशनकार्ड, मतदान कार्ड बनावट असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदार एफ. आर. शेख यांनी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची समिती गठीत करून या २२ अर्जावरील ठिकाणी जात शहानिशा केली असता, ही कागदपत्रे व फोटो, आधारकार्ड, अस्पष्ट रहिवासी प्रमाणपत्र, हमीपत्र, बँक पासबुक, तसेच उत्पनाचा दाखला, रेशनकार्ड काही ठिकाणी अस्पष्ट जोडल्याचे दिसून आले. बँक अकाऊंटची पडताळणी केली असता, हे बँक खाते हे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व इतर राज्यातील असल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.