कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात डोकेदुखीला कंटाळून शाळकरी विद्यार्थीनीने गळ्याला दोरी लावून आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय 17, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रावणीने राहत्या घरी छताला बांधत दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार श्रावणीचे वडिल प्रकाश गोरुले हे शिक्षक आहेत. सरंबळवाडी माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत असून त्याच ठिकाणी श्रावणी ही दहावीच्या वर्गात शिकत होती. श्रावणीला गेल्या पाच वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता. तेव्हापासून श्रावणीवर उपचार सुरु होते. याच महिन्यात तिला 1 जानेवारी रोजी वैद्यकीय उपचारानंतर डॉक्टरांनी औषधांचा डोस बदलून दिला होता. मात्र, श्रावणीची डोकेदुखी कमी झाली नसल्याने ती निराश होती.
तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून देखील उपचार करण्यात आले. त्याने सुद्धा काही फरक न पडल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात खासगी दवाखान्यातून उपचार सुरू होते. सोमवारी वडिल शाळेत गेल्यानंतर आणि आई कामात असतानाच श्रावणीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.