पाचगणी : पाचगणी शहरात प्रतिबंधित पदार्थाची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी तीन पानपट्टी व टपरी व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून १६ हजार २२५ रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच संबंधितांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी, तंबाखू यांचे उत्पादन आणि साठा वितरण किंवा विक्री यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. असे असताना पांचगणी या पर्यटनस्थळावर दिलखुश पान शॉप (एसटी स्टँड जवळ पाचगणी), मे. गोल्डन जनरल स्टोअर (एसटी स्टैंड जवळ पाचगणी), मे. अप्सरा पान शॉप (अप्सरा हॉटेल जवळ पाचगणी) या तीन दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका नामदेव वायकर (वय 31) यांनी धाड टाकून विमल पान मसाला, टोबॅको (पिवळा), रॉयल 717 फ्लेवर टोबॅको, हिरा पान मसाला, रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, रॉयल जाफरानी जरदा तुलसी असा विविध प्रकारचा सुमारे 16,225 रुपये किमतीचा माल जप्त केला.
याप्रकरणी पान स्टॉलचे मालक शकूर मोहम्मद केरला वाला (वय 50), अशोक यशवंत जानकर (वय 60) आणि मोहम्मद ओईस के, (वय 30) या तिघांवर पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोमदे या करत आहेत.