सांगोला (सोलापूर): सुमारे पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या हंगिरगेत १३ हजार २२८ लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यातील ५ हजार ८९५ लाडक्या बहिणीच्या घरी चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या अर्जांची चौकशी सुरु झाली आहे. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने अर्ज मंजूर करण्यात आले होते. सांगोला तालुक्यातून या योजनेतर्गत ४४ हजार ४०९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ४१ हजार अर्ज मंजूर झाले, तर ३ हजार ४६० अर्ज नामंजूर करण्यात आले होते.
राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांचा आर्थिक ताण आल्याने लाभार्थ्यांच्या अर्जांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामध्ये तालुक्यातील हंगिरगे गावाची लोकसंख्या पाच हजारांपर्यंत असताना या गावातून लोकसंख्येच्या अडीचपट जास्त म्हणजेच १३ हजार २२८ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. हे कसे घडले. बोगस नावाने अर्ज करून लाभ उचलला गेला का? याची चौकशी आता सुरु झाली आहे.
तालुक्यात ७६ ग्रामपंचायती असून १०३ गावे आहेत, तर १०० वाड्यावस्त्या आहेत. संजय गांधी निराधारचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीणचा फायदा उठविला आहे. मात्र, या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे प्रशासनाकडून अर्जांची चौकशी सुरु झाली असून अपात्र असलेल्या लाभार्थ्यांना गाळण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. चारचाकी वाहन आणि आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने निधी अभावी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.