पुणे : राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. अशातच हवामान खात्याने रविवारी ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
पुण्यातही घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा, भागात 100 मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी पश्चिम महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तर आज म्हणजेच रविवारी 14 जुलै रोजी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.