सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक

पुरंदर: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आमची जमीन द्यायचीच नाही, आम्हाला तुमचा प्रकल्प नको आहे, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. शासन एक एक आदेश काढत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाहीत. तसेच सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतेही प्रकारचे सहकार्य करणार नाही, ड्रोन अथवा पीक पाहणी करू देणार नाही, असेही शेतकऱ्यांनी म्हंटले आहे.

सोमवारी( दि. 28) प्रकल्प बाधित शेतकरी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेणार असून, विमानतळ प्रकल्पाला प्रखर विरोध करून, शासनाचा निषेध केला जाणार आहे. विरोध असताना जमीन संपादित कशी करता, प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उपजिल्हाधिकारी नियुक्त केले असून, त्यांच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शिक्के मारण्यात येणार असून, शेतकऱ्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी आक्रमक झाले आहेत. आमचा विरोध असताना, आमच्या हक्काची जमीन संपादित कशी केली जाऊ शकते. असाही सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे. याबाबत प्रकल्प बाधित गावच्या शेतकऱ्यांनी पारगाव येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्याचे ठरविण्यात आले आहे. पारगाव, खानवडी, एखतपुर- मुंजवडी, कुंभारवळण, उदाची वाडी या गावातील सर्व शेतकरी बांधव आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.







