Wardha News : वर्धा : आधुनिक काळातही मृतदेहाला आपला अखेरचा प्रवास चक्क बैलगाडीतून करावा लागल्याची धक्कादायक घटना वाघोली (ता.हिंगणघाट) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खैराटी पारधी बेड्यावर घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
आधुनिक भारतातील शोकांतिका
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत खैराटी हा पारधी बेडा आहे. या लोकवस्तीत ये-जा करण्यासाठी पक्का रस्ताच नाही. (Wardha News) त्यांमुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
दरम्यान, येथील विनोद भोसले या व्यक्तीची रात्रीच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Wardha News) पण वाटेतच विनोद यांनी अखेरचा श्वास सोडला, तर शुक्रवारी (ता.२६) विनोद भोसले यांचे शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
त्यानंतर विनोदचे पार्थिव रुग्णवाहिकेच्या साहाय्याने गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आला. (Wardha News) मात्र त्यानंतर वाहनच जात नसल्याने विनोदचे पार्थिव बैलगाडीत टाकून गावात न्यावे लागले. व त्यानंतर विनोदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आधुनिक भारतातील ग्रामीण भागात आजही पक्के रस्ते नसल्याची शोकांतिका एकप्रकारे अधोरेखित झाली. आतातरी सदर बेड्यावरील रस्ता शासनाने त्वरीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.