यवतमाळ : पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाला दोघांनी शिवीगाळ केली. तसेच त्याच्यावर धारदार तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवार, २ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील चिखलीवन परिसरात घडली. राहुल दत्ता राठोड (२९ वर्षे, रा. चिखलीवन) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून त्याच्याकडे काही थकबाकी राहिली होती. ती वसूल करण्यासाठी आरोपी मदन मोहनसिंग सिद्धू (२९ वर्षे) आणि सूरजसिंग (दोघेही रा. अफचलनगर, नांदेड) हे २ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याच्याकडे आले.
यावेळी त्याने थकबाकी परत करण्यासाठी काही अवधी मागितला. त्यावर दोन्ही आरोपी संतप्त झाले. त्यानंतर त्या दोघांनीही राहुलशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली. तसेच संतापाच्या भरात त्याच्यावर धारदार तलवारीने हल्ला चढविला. या हल्ल्यात राहुलच्या हाताला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ते धावून आले. त्यानंतर त्या दोघांची समजूत काढून त्यांनी राहुलची त्यांच्या तावडीतून सुटका केली. शिवाय त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचारानंतर राहुलने थेट दराटी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी मदन आणि त्याचा साथीदार सूरजसिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), ११५(२), २९६, ३५१ (२) (३), ३१३ आणि भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधात्मक कायद्याच्या ४ (२५) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.