चंद्रपूर : वेकोलिच्या जागेत वनविभागाने खोदून ठेवलेल्या खड्यातील पाण्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. तनवीर शेख (१९, रा. दुर्गापूर) असे मृतक मुलाचे नाव आहे.
तनवीर शेख हा लालपेठ कॉलरी क्रमांक दोनमध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. या ठिकाणी वेकोलि व वनविभागाच्या जागेत मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्यात पाणी असल्याने असल्याने तनवीर शेख आणि मित्र पोहायला गेले. परंतु, खड्डा खोल असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तनवीर शेख पाण्यात बुडाला. दरम्यान, घटनेनंतर त्याच्या मित्रांनी परिसरात ही घटना सांगितली. यामुळे घटनास्थांनी नागरिकांनी धाव घेतली. शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मनपाच्या रेस्क्यू पथकाने मृतदेह शोधण्यासाठी खड्ड्यात रेस्क्यू ऑपरेशन राबविले. तब्बल तीन तासानंतर तनवीरचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने खड्डा खोदला. मात्र, खड्ड्याच्या सभोवताल कुंपन केले नव्हते. त्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील लालपेठ कॉलरी नंबर दोनमध्ये खुली जागा असून तिथे वनविभागाने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जवळपास एक हेक्टर जागेवर झाडे लावण्याचे काम हाती घेतले आहे. येथील झाडांना पाण्याची सोय व्हावी यासाठी मोठा खड्डा वनविभागाने खोदला आहे. सुरक्षेसाठी खड्यासभोवताल काहीच केले नाही. तनवीर आणि त्याचे मित्र या खड्ड्याकडे फिरण्यासाठी आले. पाणी दिसल्याने त्यांना पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र पोहाण्याचा मोह तनवीरच्या जीवावर बेतला आहे.