अकोला : भुसावळ–वर्धा एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणाला प्रवाशांसमोर अनोख्या पद्धतीने धडा शिकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव ते बडनेरा दरम्यान प्रवास सुरू असताना एका तरुणाने सहप्रवासी तरुणीशी अश्लील वर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तरुणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे वर्तन सुरूच राहिल्याने तिने ठाम भूमिका घेत त्याला सर्वांसमोर जाब विचारला.

तरुणीचा आक्रमक पवित्रा पाहून डब्यातील इतर प्रवासीही तिच्या मदतीसाठी पुढे आले. त्यानंतर संबंधित तरुणाच्या हातात बांगड्या भरून त्याच्या ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावण्यात आली. महिलांचा सन्मान करण्याचा संदेश देत त्याला अशा प्रकारे धडा शिकवण्यात आला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले असून महिलांनी अन्यायाविरोधात आवाज उठवावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची स्वतंत्र पडताळणी झालेली नसून, संबंधित घटनेची अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.






