यवतमाळ: शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना यवतमाळमधून (Yavatmal Crime) समोर आली आहे. शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. खासगी शिकवणीच्या नावाखाली शिक्षकाने घरी बोलावून 16 वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केले, ज्यामुळे ती गर्भवती राहिली. यानंतर गर्भपात करण्यासाठी दिलेल्या गोळ्यांच्या ओव्हरडोजमुळे तिचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

ही घटना यवतमाळमधील एका गावात घडली असून, आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेत होता. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकायला जात होती. मात्र, शिक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. शिकवण्याच्या बहाण्याने तो तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता.
जेव्हा पीडित मुलगी गर्भवती राहिली, तेव्हा आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. जास्त गोळ्या खाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली आणि ती आजारी पडली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली.

कुटुंबीयांनी तातडीने तिला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून शिक्षकाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबीय करत आहेत.







