चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात सायबर तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन एका विधवा महिलेला फसवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमूर तालुक्यातील नेरी गावातील 60 वर्षीय दत्तू पिसे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झाले होते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. त्याने व्हॉईस चेंजर ॲपचा वापर करून स्वतःचा आवाज बदलला आणि स्वतःला “विद्या गोखले” नावाची महिला सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलेला वारंवार फोन केले. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर देवीचा कोप होईल आणि कुटुंबावर संकट येईल, अशी भीती दाखवत मानसिक दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा सुरू होती. ही सुविधा तिच्या पतीने निधनापूर्वी सुरू करून दिली होती. त्यामुळे आरोपीचे सर्व संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. रेकॉर्डिंग पुन्हा ऐकल्यानंतर महिलेला बोलण्याच्या शैलीवर संशय आला.
तपास केल्यानंतर फोन करणारी कथित महिला अधिकारी नसून शेजारी राहणारा दत्तू पिसे असल्याचे तिच्या लक्षात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, दत्तू पिसे हा भाजपचा तहसील उपाध्यक्ष होता. पक्षविरोधी कामांमुळे त्याला पदावरून काढले होते.
दरम्यान, पिडीतेने दत्तू पिसेविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच कॉल रेकॉर्डिंगचा पुरावाही पोलिसांकडे जमा केला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.






