जिवती (चंद्रपूर) : जिवती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ताडी हिरापूर येथे अनैतिक संबंधातून प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह वर्धा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामदास रावसाहेब नंदेवाड (२८, रा. ताडी हिरापूर) असे मृतक पतीचे नाव आहे. संगनमत आणि फौजदारी कट रचून बेपत्ता पतीची हत्या केल्याप्रकरणी पत्नी रेणुका रामदास नंदेवाड (२८, रा. ताडी हिरापूर) व प्रियकर श्रीनिवास बापूराव घंटेवाड (३०, रा. भोलापठार) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
रामदास रावसाहेब नंदेवाड हा ५ सप्टेंबरला कोंबडा घेऊन येतो, असे सांगत घरातून बाहेर पडला. मात्र रात्र होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे पती बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी रेणुकाने जिवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार जिवती पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे जिवती पोलीस ठाण्यात नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. तपासादरम्यान विवाहित रेणुका या महिलेच्या प्रियकराची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविला असता त्याने बेपत्ता रामदास नंदेवाड याची दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेह राजुरा येथील वर्धा नदीत फेकल्याची माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांकडून वर्धा नदीमध्ये मृतकाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी श्रीनिवास घंटेवाड व रेणुका नंदेवाड यांच्यात लग्नाच्या पूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांत मोबाइलद्वारे नेहमीच संभाषण व्हायचे. दरम्यान, पतीचा गेम करण्याची चर्चा प्रियकरासोबत करायची. त्यानुसार प्रियकराने हत्येचा कट रचला. अखेरीस रेणुकाच्या मदतीने प्रियकर श्रीनिवासने ५ सप्टेंबरला रामदासला फोन करून पार्टीसाठी शेनगाव येथील टेकामांडवा फाट्यावर बोलावून घेतले. दोघे एका ऑटोरिक्षात बसून गडचांदूरला गेले. गडचांदूरमध्ये दोघांनी मिळून दारू ढोसली.
त्यानंतर रामदासला कसेबसे ऑटोरिक्षात बसवून राजुरामार्गे निघाले. वर्धा नदीपुढे जाऊन पुन्हा दारू ढोसली. यावेळी आरोपीने रामदासचे डोके दगडाने ठेचून ठार केले आणि त्याला वर्धा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिले. आरोपीनने दिलेल्या बयाणाप्रमाणे नदीत शोध सुरू आहे. मात्र अद्यापही मृतदेह नदीमध्ये आढळून आला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांनी जिवती पोलीस ठाण्याला भेट दिली. पुढील तपास जिवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे करीत आहेत.