वर्धा : वर्ध्यातून एक धाकादायक घटना समोर येत आहे. महिला पोलिसाला घरी बोलावत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकृती बिघडल्याचा बहाणा करत महिला पोलिस शिपायाला घरी बोलावून तिला खोलीत नेत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या महिला पोलिसाला चौघींनी लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने जबर मारहाण करत जखमी केले आहे. या पप्रकरणी महिला पोलीस शिपायानी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस कर्मचारी महिलेची शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर या महिलेशी पूर्वीपासून ओळख होती. पोलीस शिपाई कर्तव्यावर असताना शुभांगीने तिला फोन करून माझी प्रकृती बिघडली आहे असं सांगत घरी येऊन रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. पोलीस शिपाई शुभांगीच्या घरी गेली असता शुभांगीने तिला घरातील खोलीत नेत दार बंद केलं. दार उघडले असता तेथे आधीच तीन महिला उपस्थित होत्या. यांनी सर्वांनी मिळून तिचा विनयभंग करत हातातील सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट काढून घेतले.
तसेच पट्ट्याने मारहाण केली. एका महिलेने पोलिस शिपायाच्या मानलेल्या भावास फोन करून बोलावून घेतले. यावेळी भाऊ आला असता त्यालाही मारहाण करून त्याच्या प्रेयसीला फोन लावण्यास सांगितले, मी तुझ्या प्राॅपर्टीवर प्रेम केलं, तुझ्यावर नाही, असं बोलण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर त्याच्या प्रेयसीला बोलावून तिला देखील मारण्याची धमकी देत पोलिस शिपाई व तिचा मानलेला भाऊ यांना मारण्यास लावले.
घडलेला सर्व प्रकार महिला शिपायाने रामनगर पोलीस ठाण्यात जावून सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ शुभांगी देशमुख, रा. गजानन नगर, पल्लवी राऊत, रा. पवनार, प्रीती महेश राऊत, रा. पवनार, शारदा राऊत, रा. पवनार, वैशाली टिपले, रा. गजानन नगर, आविष्कार देशमुख, रा. गजानन नगर, शैलेश राऊत, रा. पवनार, महेश ऊर्फ बबलू राऊत, रा. पवनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.