रिसोड (वाशीम) : एकाच ठिकाणी अवघ्या सात मिनिटाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात. दोन जण गंभीर तर, १२ जण किरकोळ जखमी झाले. सदर घटना १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा दरम्यान रिसोड -सेनगाव मार्गावरील शाही धाब्याजवळ घडली. जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे. या अपघातात जिवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार रिसोडवरून हिंगोलीचे दिशेने जात असलेल्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर कार रस्त्याच्या कडेला नालीमध्ये उतरली. या कारच्या एअर बॅग उघडल्याने प्रवास करत असलेले तिघे किरकोळ जखमी झाले. तर, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर कार ही नवीन असल्याचे बोलले जात आहे. घटना घडली असताना याच ठिकाणी सात मिनिटाच्या नंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून रिसोड शहरातील पठाणपुरा भागातील नागरिक रिसोडकंडे येत असताना सदर जीप रस्त्यावर असलेल्या मातीचा ढिगारावर चढली. या अपघातात आठ जण जखमी झाले.