चिमूर (चंद्रपूर): अवकाळी पावसाचा मारा अधूनमधून सुरूच असला तरी उकाडा कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, वन्यप्राणीही यातून सुटले नाही. त्यामुळे वन्यप्राणीही गारवा शोधताना दिसत आहे. ताडोबातील एका वाघिणीने उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पाणवठ्यातच बछड्यांसह ठाण मांडल्याचा प्रसंग अनेक पर्यटकांनी अनुभवला.
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात उन्हाळा महणजे पर्यटकांसाठी पर्वणीय. पाणवठठ्यावर त्यांना अनेक प्राण्यांचे दर्शन होत असते. पाणवठ्यावर असलेला वाघ पाहणे पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘के-मार्क’ या वाघिणीला न ओळखणारे असे नाहीतच. ताडोबात ती पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. तिच्या दोन बछड्यांसह फिरताना नेहमीच दिसून येते. ताडोबातील वाघीण ‘माधुरी’ आणि ‘खली’ या वाघाची मुलगी म्हणजे ‘के-मार्क’. आता तीसुद्धा तीन बछड्यांची आई झाली असून बछड्यांसह फिरताना पर्यटकांना दिसून येत आहे. ताडोबाच्या केसलाघाट पर्वतरांगाभोवती तिचे अस्तित्व असते. या धाडसी आणि सुंदर वाघिणीने दक्षिण ताडोबाच्या फैसलाघाट आणि झारी-पेट जंगलावर आपले साम्राज्य स्थापित केले आहे. ‘के मार्क’ ही वाघीण अतिशय जोखमीच्या भागात राहते. या वनक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग जातो. तिला हिवाळ्यात अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पाहिले आहे. अलीकडे तिच्या या पाणवठ्यातील व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.