अमरावती : तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रक घालून त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवार, १२ एप्रिल रोजी पहाटे भातकुली कोलटेक मार्गावर घडली. याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रकचालक अतुल धंदर (रा. निंभा) व सूरज नागमोते (३५, रा. भातकुली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निभा येथून भातकुलीकडे वाळूची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची माहिती तहसीलदार अजितकुमार वसंत येळे (५०) यांना मिळाली होती. त्याआधारे ते कवठा येथील तलाठी सतीश बहाळे यांच्यासह दुचाकीने पेढी नदीच्या पुलावरील स्मशानभूमीकडून भातकुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबले. काही वेळाने त्यांना निंभा गावाहून निळसर रंगाचा विनाक्रमांकाचा मिनीट्रक भातकुलीकडे येताना दिसला. त्याचा पाठलाग करून अजितकुमार येळे यांनी तो मिनीट्रक थांबविण्याची सूचना चालकाला केली.
मात्र, त्याने ट्रक थांबविला नाही. चालकाने ट्रक अजितकुमार येळे यांच्या अंगावर आणून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तर सूरज नागमोते याने अजितकुमार येळे यांची दुचाकी अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जिवाने ठार मारून टाकेन, अशी धमकी त्याने त्यांना दिली. याप्रकरणी अजितकुमार येळे यांनी भातकुली ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.