चंद्रपूर : विधनसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रचारसभांमध्ये नेत्यांकडून मोठं मोठ्या घोषणा केल्या जात आहे. अशातच ‘महायुतीचे नवं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार.’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपूरमध्ये केली. महायुतीचे चंद्रपूर क्षेत्राचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूरमधील प्रचारार्थ जाहीर सभेदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
किशोर जोरगेवार हे २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. या सभेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार फॅग्गनसिंग कुलेस्ती यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ‘काँग्रेस सत्तेत आली तर ही योजना बंद करेल.’, असे त्यांनी सांगितले. तसेच, ‘महायुती सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ.’, अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील प्रचारसभेदरम्यान सुद्धा शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केले. त्यांनी त्यावेळी सांगितले होते की, ‘तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आले की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल. या व्यतिरिक्त MSP पेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील.’ फडणवीसांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.