अमरावती : अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक सत्य समोर आले आहे. स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करून सहानुभूती मिळवण्यासाठी आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये आपली बाजू मजबूत करण्याच्या उद्देशाने विपुल ठाकरे यानेच घरावर गोळीबाराचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेनंतर अमरावती गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या कटासाठी सुमारे 1.5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. गोळीबार करण्यासाठी दोन जण दुचाकीवरून अर्जुन नगरमध्ये आले. त्यांनी चेहरा झाकण्यासाठी बुरख्याचा वापर केला आणि थेट विपुल ठाकरे यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला. या घटनेचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

विपुल ठाकरे याच्यावर यापूर्वी एका महिलेच्या लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणांमध्ये तो काही काळापासून फरार होता. कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यानंतर स्वतःवर हल्ला झाल्याचे चित्र उभे करून पोलिस आणि न्यायालयासमोर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपासातून समोर आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. गोळीबारासाठी शस्त्र कुठून आणण्यात आले, पैशांचा व्यवहार कसा झाला आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.







