सुरत : सुरत शहरातील भेस्तान परिसरात कुख्यात गुंड सतीश धागडे उर्फ सतीश मराठा याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 39 वेळा तलवारीने वार केल्याची माहिती समोर आली असून, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी सतीश आपल्या मैत्रिणीसोबत कारमधून जात होता. त्याने तिला महाविद्यालयातून सोबत घेतले होते. त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग केल्याचा पोलिसांना संशय आहे.

प्राथमिक तपासात हा खून परिसरातील वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सतीश मराठा आणि दुसरा गुंड राहुल मंडल उर्फ राहुल ‘अपार्टमेंट’ यांच्यात काही काळापासून वैर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आपल्या टोळीतील एका व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राहुल मंडलने हत्येचा कट आखल्याचा संशय आहे.

गोडादरा परिसरातील कुख्यात गुंड सतीश उर्फ सत्या मराठा याच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येमागे लाजपोर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेला गुन्हेगार राहुल सोमन मंडळ याने तुरुंगात असतानाच हत्येचे नियोजन करून बाहेर असलेल्या साथीदारांच्या मदतीने हा कट अंमलात आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

भेस्तान परिसरात भरदिवसा सतीश मराठावर झालेल्या हल्ल्याचे दृश्य जवळच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हे चित्रण सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. पोलिसांनी हे चित्रण तपासातील महत्त्वाचा पुरावा मानले आहे. त्यामध्ये पाच हल्लेखोर सतीशवर धारदार शस्त्रांनी हल्ला करताना दिसत असल्याची माहिती आहे. त्याच्या शरीरावर तब्बल 39 वार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तपासात सतीश आणि राहुल मंडळ यांच्यातील जुना वादही समोर आला आहे. दारूच्या कथित अवैध व्यवसायासह इतर बेकायदेशीर धंद्यांवर वर्चस्व मिळवण्यावरून दोघांमध्ये वैर असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणातून राहुलने आपल्या साथीदारांच्या मदतीने सतीशच्या हत्येचा कट आखल्याचा संशय आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली असून, त्यापैकी 5 जणांना पोलीस कोठडीत आहे. राहुल मंडळ सध्या कारागृहात असल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी भेस्तान पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याची चौकशी झाल्यानंतर हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणातील ‘रिंकू’ नावाचा संशयित अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.







