नागपूर : नागपूर येथील नवाबपुरा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना समोर आली आहे. वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने कुख्यात गुन्हेगार असलेल्या मुलाने वडिलांना शिविगाळ करत त्यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगड्यांवर व नाकावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने ६२ वर्षाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडे चार ते सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली.
कोतवाली पोलिसांनी आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. कुशल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (वय-३३, रा. फ्लॅट नं. १ करण अपार्टमेंट, नवाबपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. तर दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (वय-६२) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय हे आपला मोठा मुलगा प्रणव, आरोपी लहान मुलगा कुशल उर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य उर्फ गणु अनिल शेंडे यांच्यासोबत राहत होते. शनिवारी आरोपी इंगाने वडिल दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्यामुळे आरोपी इंगाला राग आला. त्याने वडिलांना शिविगाळ करत वडिलांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगडीवर, नाकावर हाताबुक्यांनी आणि लाथांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडील दत्तात्रय शेंडे गंभीर जखमी झाले.
त्यानंतर जखमी अवस्थेतील दत्तात्रय यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दत्तात्रय यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रणव शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी इंगा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.