भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारधा येथील दांपत्याने वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. दोघांचेही मृतदेह सापडले असून त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना ९ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास कारधा येथील वैनगंगा नदीपात्रात घडली आहे.
मनोज बाबुराव सुदामे (वय-५१) आणि भारती मनोज सुदामे (वय-४७, रा. दिलीप नगर नझुल लेआउट, नागपूर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पुलावरून या दांपत्याने नदीत उडी मारली होती. दरम्यान, पत्नीचा मृतदेह हा सोमवारी १२ ऑगस्ट तर पतीचा मृतदेह हा मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी सापडला आहे.
या घटनेची माहिती कारधा पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांना मृत व्यक्तीच्या बॅगमध्ये ब्लॅकेट आणि त्यांचे कपडे सापडले आहेत. त्यामध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे मृतांची ओळख पटु शकली नाही. पतीच्या खिशात आधारकार्ड सापडल्या वरून मनोज बाबुराव सुदामे असे त्याचे नाव असल्याचे समजले. त्यावरून मृत महिलेचे नाव भारती मनोज सुदामे असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मनोज सुदाम हा प्रॉपर्टीचे काम करत होता. तो आणि त्याची पत्नी आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारधा पोलिसांनी बुधवारी त्या दोघांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम थेर करत आहेत.