Sunil Kedar : माजी मंत्री सुनील केदार यांना शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलं आहे. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहितीम आहे. दरम्यान, नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
केदार यांची न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
सुनील केदार यांना न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर ५ वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर न्यायालयातून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले होते.
रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार असून सध्या डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच इतर आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल २२ डिसेंबरला लागला. यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. पुढे खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले होते. केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून यातील काही आरोपींना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.