गडचिरोली : गडचिरोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्तीसारखे प्राणी बघितले की आपल्याला कधीतरी पाहायला मिळतात म्हणून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. असाच सेल्फी घेण्याचा मोह एका व्यक्तीला आवरता आला नाही. परंतु या मोहात मात्र त्याला आपला जीव गमावावा लागला आहे. गडचिरोलीमध्ये ही धक्कादायक घटना आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला आहे. हत्तीने मजुराला पायाखाली चिरडून जागीच ठार केलं आहे. गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात घडलेली ही घटना. श्रीकांत रामचंद्र सतरे असं या मृत मजुराचं नाव आहे. मूळचा चंद्रपूरचा असलेला श्रीकांत गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचं काम करण्यासाठी आला होता. गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होतं.
चातगाव आणि गडचिरोली वन परिक्षेत्रातून जंगली हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केला होता. आबापूर जंगलात हा हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली. त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते. हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न होता. तेव्हाच हत्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पायाखाली चिरडलं. तोपर्यंत इतर दोघंजण तिथून पळाले. त्यामुळे ते आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले. मात्र सेल्फी काढणारा मात्र जागेवरच मृत्युमुखी पडला.