गोंदिया : ऑनलाईन गेम्सच्या नादामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याला ऑनलाईन गेम्स खेळण्याचं व्यसन लागलं आणि त्यात त्याने आपल्याकडचा सगळा पैसा लावला. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. यामुळे त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेऊन बेवारटोला धरणाच्या पाण्यात उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर भुरे वय वर्ष 36 असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ज्ञानेश्वर भुरे ड्यूटीवर जातो असं पत्नीला सांगून घराबाहेर पडले, मात्र ड्युटीवर न जाता त्यांनी थेट आत्महत्या करण्याचा विचार करून ते धरणाजवळ आले अंडी त्यांनी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली.
ड्युटी संपून बराच वेळ झाल्यानंतरही घरी न आल्याने पत्नी माधुरीने आपले सासरे भाऊराव भुरे यांना फोन करून ज्ञानेश्वर हे ड्यूटीवर गेले नाहीत आणि घरीही परतले नाहीत, असे सांगितले. ज्ञानेश्वर यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.
यावर पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार माधुरीने दिली. तर सालेकसा तालुक्यातील बेवारटोला येथील धरणात त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे भुरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.