बुलढाणा : बुलढाणा शहरातून एक खलबळजनक घडल्याचे समोर आले आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बुलढाणा शहरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजय गिरी असे आत्महत्या करणाऱ्या अंगरक्षकाचे नाव आहे.
अजय गिरी हे आज कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले होते. त्याच बंदुकीतून अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषीत केले आहे. गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे.
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का : आमदार श्वेता महाले
माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच पण त्याचबरोबर घरातील सदस्यासारखे होते. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे.