वाशिम : वाशिम मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीय मुलाचं अपहरण करून 60 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे. एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडे याचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आहे.
अधिक माहिती अशी की, साधुडे कुटुंबीय शेतकरी आहेत. त्यांनी काही महिन्यापूर्वी वाशिम-पुसद मार्गावरील आपली शेतजमिन विकली होती. जमीन विक्रीतुन मोठी रक्कम त्यांना मिळाली होती. साधुडे कुटुंबीयांकडे शेतजमिनीतून मोठी रक्कम मिळालेली असल्याची माहिती अपहरणकर्त्यांना होती. त्यातूनच साधुडे यांचा 14 वर्षीय मुलगा अनिकेतचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपहरणकर्त्यांनी अपहरणानंतर अनिकेतच्या घराबाहेर मिळालेल्या 5 पानी लिहिलेल्या पत्रात खंडणीची मागणी केली आहे. यावर माझ्या मुलाला सुखरुप माझ्याकडे पोहोचवावे, मी अपहरणकर्त्यांना त्यांची मागितलेली रक्कम द्यायला तयार आहे, असे अनिकेतच्या वडिलांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनिकेतचे अपहरण होऊन 5 दिवस झाले आहेत. मात्र अजूनही पोलिसानां आरोपींचा व अनिकेतचा थांगपत्ता लागलेला नाही. पोलिसांनी अनिकेतच्या तपासासाठी 9 विशेष पोलीस पथके तयार करून रवाना केली आहेत. पोलिस शेकडो सी सी टी व्ही आणि मोबाईल नंबरचा डेटा गोळा करून तांत्रिकदृष्टया तपासणी करत आहेत.