नागपूर : इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून, खासगी आणि शासकीय शाळांना हा नियम लागू होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळांसंदर्भात राज्य सरकारला सूचना दिली होती. ‘मुलांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ ही सातऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलावी, जेणेकरून मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांचे शिक्षणात लक्ष लागेल, आणि मुलाचं आरोग्यही चांगल राहील.
तसेच सकाळची पालकांची धावपळही कमी होईल’, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. या सूचनेची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीअर केजी, इयत्ता पहिली आणि दुसरीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपक केसरकर यांनी सांगितले, बदलत्या जीवनशैलीमुळे सकाळी शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. त्यांच्या या मताशी सरकार सहमत आहे.
पण, एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, तसेच सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असही केसरकर यावेळी म्हणाले.