नागपूर: देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर मग नरेंद्र मोदी ओबीसी कसे? असा सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला आहे. तर, आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना करणार असं आश्वासनही राहुल गांधी यांनी दिलं. नागपुरात काँग्रेसचा 139 व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसी असल्याचं म्हणाले होते. त्यांचं सरकार हे ओबीसी असल्याचं ते म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारलं की, त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत? त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी हे ओबीसी अधिकारी आहेत? त्यानंतर ते म्हणाले की देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबी. मग असे असेल तर तुम्ही स्वतःला ओबीसी कसे काय म्हणता?” यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना घेरलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधींनी आयएएस अधिकाऱ्यांता दाखला दिला. ते म्हणाले की, “देश फक्त 90 लोक चालवतात. त्यामध्ये आयएएस अधिकारी आहेत, ते संपूर्ण बजेटचे नियोजन करतात. या 90 लोकांमध्ये 3 अधिकारी हे ओबीसी असल्याचं समोर आलं आहे. मग हे कसलं ओबीसींचे सरकार? भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या असतील, त्यामध्ये किती ओबीसी समाज आणि दलित आहेत हे सरकारने स्पष्ट करावं.”
आताही भारतात ब्रिटिशांचे राज्य असल्याची परिस्थिती आहे. कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही, ही आरएसएसची विचारधारा आहे, आता देश त्याच मार्गावरून नेला जात असल्याचंही ते म्हणाले. भाजपची कार्यपद्धत ही वरून आदेशाचं पालन करणारी आहे. त्याच्या विरुद्ध अशी काँग्रेसची पद्धत आहे. आमच्या पक्षात साधा कार्यकर्ताही नेत्यांना विरोध करू शकतो. अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. त्यावर मी त्यांचं ऐकून घेतो. काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू आहे.