नागपूर: नागपूरमधील नरेंद्र नगर येथील सुंदरबन अंडरपासजवळ प्रेमप्रकरणातील वादातून दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांमध्ये भररस्त्यात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत गौरव रगडे (वय २७) याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि त्याचा साथीदार दीपक वासनिक या दोघांना अटक केली आहे.

गौरव रगडे याचे गेल्या दोन वर्षांपासून सपना नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, अलीकडच्या काळात सपनाची जवळीक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील गौरव राऊत याच्याशी वाढली होती. राऊतने सपनासाठी नरेंद्र नगर परिसरात भाड्याने घर घेतले होते. दोघे मिळून क्लाउड किचनचा व्यवसायही करत होते. या कारणावरून रगडे आणि राऊत यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आहे.

गौरव रगडे हा खून, दरोडा, खंडणी तसेच नागपुरातील एका उद्योजकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याच्या प्रकरणात तुरुंगात होता. नुकताच तो तुरुंगातून बाहेर आला होता. गुरुवारी तो गौरव राऊतच्या घरी पोहोचला. त्यावेळी राऊत आणि सपना एकत्र पार्टी करत असल्याचे त्याने पाहिले. त्यामुळे रगडे संतप्त झाला.

राऊतने घराचा दरवाजा न उघडल्याने रगडेने खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर राऊत दुसऱ्या मार्गाने घराबाहेर पळून गेला. रगडेने त्याचा सुमारे दीड किलोमीटर पाठलाग केला. अखेर सुंदरबन अंडरपासजवळ दोघे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास अर्धा तास तुंबळ हाणामारी झाली.
या झटापटीदरम्यान गौरव रगडेच्या कमरेला असलेला धारदार चाकू गौरव राऊतच्या हातात आला. राऊतने त्याच चाकूने रगडेच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर आणखी वार करण्यात आले. या हल्ल्यात रगडे गंभीर जखमी झाला. त्याच्या अंगावरील पांढरा शर्ट रक्ताने माखला होता.
गंभीर जखमी अवस्थेत रगडे रस्त्यावर कोसळला. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून गौरव प्रभाकर राऊत आणि त्याचा साथीदार दीपक वासनिक या दोघांना अटक केली. या हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.







