गोंदिया : गोंदिया शहरातील कुडवा परिसरात 6 जानेवारी रोजी मध्यरात्री दरम्यान एका युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. उसनवारी पैशाच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. मनीष भालाधरे राहणार कुडवा असे मृतकाचे नाव आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा कुडवा येथील रहिवासी आहे. त्याचे नाव मनीष भालाधरे आहे. संतोष मानकरअसे आरोपीचे नाव आहे.
सदर घटना गोंदिया ते धापेवाडा मार्ग परिसरात घडली. मनीष भालाधरे व संतोष मानकर यांच्यामध्ये उधारीच्या पैशावरून वाद असल्यामुळे या पूर्वी ही अनेकदा त्यांच्यात वाद विवाद झाले होते. मात्र काल मध्यरात्री झालेला वाद इतका विकोपाला गेला की त्या वादात संतोष मानकरने मनीष भालाधरे याचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. याच कुडवा परिसरात दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे प्रेम प्रकरणातून एका युवकाची हत्या करण्यात आली होती.