OBC Reservation: नागपूर : ओबीसींना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालेले आहे. ओबीसीची संख्या ५२ टक्के आहे. मात्र, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, म्हणून ओबीसीला केवळ २७ टक्के आरक्षण मिळाले. आम्ही कोणाचेही आरक्षण हिसकावलेले नाही किंवा अतिक्रमण देखील केलेले नाही. मात्र, जरांगे पाटीलांची भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांचे आरक्षण कोणी हिसकावलेले नाही. संविधानानुसार आरक्षण दिलेले आहे. ‘तुम्ही आरक्षण लुटले’ असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. आता ओबीसींच्या सभा सुरु होणार आहेत. संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी ओबीसी रस्त्यार येत आहेत. आम्ही आमच्या हक्कासाठी संघर्ष तयार आहोत. आम्हाला धमक्या देऊ नका. जालन्यातील अंबड येथील उद्याच्या मेळाव्याला पाच लाख लोक येतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली.
आरक्षणासंदर्भात अनेक आयोगांनी काम केले आहे. त्या संदर्भातील यादी देखील जाहीर केली आहे. त्यानुसार आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे कोणी म्हणत असेल की तुम्ही लुटले, तर ते म्हणणे योग्य नाही. असे असतानाही आम्हाला धमक्या येत आहेत. आम्हाला विरोधक समजू नये. आम्ही त्यांच्या आंदोलनाला विरोध केलेला नाही. मराठा समाजाची मागणी कशी सोडवायची तो सरकारचा प्रश्न आहे, असेही तायडे यांनी सांगितले. दोन समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून संघर्ष करणाऱ्या नेत्यांना धमक्या देण्यात येत आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी आली आहे. काहींना लिखित स्वरूपात सुद्धा धमक्या आल्या आहेत. या धमक्यांमुळे जर काही नेत्यांना असुरक्षित वाटत असेल आणि त्यांनी जर सरकारकडे सुरक्षेची मागणी केली असेल तर त्यांना संरक्षण द्यावे, असेही तायडे यांनी सांगितले.
सरकारपुढे अनेक पेच असतात. सर्व बाबींची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. सरकारने वेळ मागितला असला, तरी त्या टाईम बाऊंडमध्येच ती मागणी पूर्ण होईल हा अट्टाहास योग्य नव्हे. सरकार वारंवार सांगते आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाप्रती कटिबद्ध आहोत, मुख्यमंत्र्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे, त्यामुळे धीर धरायला हवा, असेही तायडे यांनी म्हटले आहे. आम्ही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत. एकजुटीने सगळे ओबीसी काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.