नागपूर : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला असून त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील देशपांडे सभागृहात विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सध्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झाले असून येत्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुकीत अशाच प्रकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीने १५ डिसेंबर रोजी विदर्भातील पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, नवनिर्वाचित आमदार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.