नागपूर : नागपुरच्या पाटणकर चौक परिसरातील बालसुधार गृहात मोठी घटना घडली आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहातून सहा विधिसंघर्षग्रस्त सुरक्षारक्षकांवर हल्ला करून पळाले. रविवारी ही घटना घडली. दुपारी या अल्पवयीन मुलांना थंडी निमित्त बाहेर उन्हात काढले असता त्यातील सहा मुलांनी हा डाव साधत पळ काढला आहे. पळून जाण्यापूर्वी या मुलांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची ताडफोड केली.
पळालेले सर्व मुलं 17 वर्षे वयोगटातील आहेत. या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या काळात यांच बालसुधार गृहामध्ये दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यातच आता 6 विधिसंग्रघर्षग्रस्त पळाले असल्याने कारागृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पळालेले विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन घातक असल्याचे कळते. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे रिमांड होम असो की बालगृह अशा घटना घडत आहेत.
पाटणकर चौक परिसरातील असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या बालसुधार गृहामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या बालकांना ठेवले जाते. पळालेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलांतील दोघांवर खुनाचा व एकावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आहे. तर तिघे अट्टल चोर आहेत.