Manoj Jarange : परभणी : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला म्हणजेच 2 दिवसात संपत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी मनोज जरांगेंच्या परभणीत तीन सभा होणार आहेत. पहिली सभा सकाळी 10 वाजता सेलू इथे दुसरी सभा दुपारी 12 वाजता सोनपेठ तर तिसरी सभा गंगाखेडमध्ये दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तर रात्री 7 वाजता लातूरमधील रेणापूर इथे मनोज जरांगेची सभा असेल.
2 दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर बीडच्या 23 डिसेंबरच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेटमवर मनोज जरांगे ठाम आहे. त्यामुळे 23 डिसेंबरच्या सभेत मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
सर्व सोयऱ्यांना आरक्षण
सरसकट या शब्दाभोवती फिरणारी मराठा आरक्षणाची चर्चा आता सगेसोयरे शंब्दावर येऊन पोहोचली आहे. आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असं म्हणणाऱ्या जरांगेंनी सांगितलं होतं. आता नवी मागणी केली आहे. ती म्हणजे, सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या, पण जरांगेंची ही मागणी कायद्याच्या कचाट्यात बसणारी आहे का? या मागणीमुळे आरक्षणाचा तिढा अधिक वाढवणार का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.